satyaupasask

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

शिर्डी / अहिल्यानगर: जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. राहता शहरातील नागरिकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महत्त्वपूर्ण भाष्य केले. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याबाबत त्यांनी वक्तव्य केले.

लाडक्या बहिणी कारभारी झाल्या आहेत. विरोधक म्हणायचे तुमची योजना बंद होईल. योजना बंद झाली का? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित नागरिकांना विचारला. यावर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सांगितले, “चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही. चालू आहे की बंद आहे, याचे उत्तर द्या,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “जानेवारी महिन्याचा हप्ता येईल. मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार आहे.” महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधीच दूर करणार नाही, हे सांगण्याचा त्यांनी आग्रह केला.

शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी लाडकी बहीण योजनेबाबत हे वक्तव्य केले.

लाडक्या बहिणींना जानेवारीची रक्कम लवकरच मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता 26 जानेवारीपूर्वीपासून मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्य सरकारने जानेवारी महिन्यातील लाभाच्या वितरणासाठी 3690 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे दिले आहेत. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 47 लाख लाभार्थी महिलांना या योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळाली होती.

लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9000 रुपये मिळाले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जुलै 2024 पासून सुरू केली आहे. या योजनेचे पहिले दोन हप्ते एकत्रितपणे ऑगस्ट महिन्यात दिले गेले. त्यानंतर डिसेंबरपर्यंत एकूण 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली. म्हणजेच, 1500 रुपयांप्रमाणे महिलांना एकूण 9000 रुपये मिळाले आहेत. महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *